*युगप्रवर्तक राजा : शिवाजी महाराज*


*युगप्रवर्तक राजा : शिवाजी महाराज*

प्रजेचा सांभाळ पित्याप्रमाणे करणारे कनवाळू पिता होते, तसेच बंडखोर-फितुरांना देहदंडाची शिक्षा देणारे कर्तव्यकठोर, न्यायनिष्ठुर राजाही होते. शिवछत्रपती हे माणूस होते की नियतीला पडलेले पूर्णत्वाचे स्वप्न होते, कळत नाही. आपण त्यांच्यातील एक तरी गुण अंगीकारावा हीच शिवजयंती साजरी करण्याची सगळ्यात चांगली पद्धत असेल!

संपूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करीत असताना प्रश्न असा पडतो की, तीनशे वर्षांहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही ते आपल्याला आजही हवेहवेसे अन् आदरणीय, आदर्श का वाटतात? याची बीजे महाराजांच्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीत व दूरदृष्टीत आहेत.

पु.ल. देशपांडे यांनी एके ठिकाणी खूप सुंदर म्हटले होते की, राजेमहाराजांच्या काळात एखाद्या राजाच्या गळ्यात कितीही सोन्या-मोत्याचे अलंकार असले तरी आवर्जून कवड्यांची माळ राजे धारण करायचे. याचे विचार करायला लावणारे कारण म्हणजे, राजाने प्रजेच्या सुखापुढे, कल्याणापुढे स्वत:चे सुख-दु:ख, आराम, कवडीमोल समजायचा असतो. राजाला सारी सुखे त्याच्या पायाशी लोळण घेत असतानाही उपभोगशून्य स्वामी असे म्हटले जायचे, ते याचमुळे. राजाने या आरामात न रमता अहोरात्र प्रजेप्रति आपली असणारी कर्तव्ये पार पाडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणे अपेक्षित होते. या साऱ्या वर्णनात अगदी चपखलपणे कुठला राजा बसत असेल तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. म्हणूनच शिवछत्रपतींच्या चरित्राकडे पाहताना देदीप्यमान अशा त्यागाची, अतुलनीय धैर्याची, प्रजेचा सांभाळ करणाऱ्या प्रजाहितदक्ष राजाची, विज्ञाननिष्ठ साधकाची, सर्वधर्मसमभावाची, परधर्मसहिष्णू असलेल्या प्रगल्भ प्रशासकाची… अशी किती तरी रूपे आपल्या नजरेसमोर तरळतात. आणि तरीही महाराजांचे चरित्र याहूनही अधिक आणि वेगळे असल्याची जाणीवही मनात दाटत असते. खरे तर छत्रपती शिवाजी महाराज ही केवळ एक व्यक्ती नाही तर ती एक विचारसरणी आहे. आपण काही अंशाने जरी ती अंगीकारू शकलो तरी समाज म्हणून आपण अधिक उन्नत व प्रगल्भ होऊ.

छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जेव्हा युगप्रवर्तक म्हणतो तेव्हा शिवछत्रपतींच्या जन्मापूर्वीचे युग कसे होते आणि शिवछत्रपतींच्या राज्यकारभारातून नेमके कोणते युग सुरू झाले, हे पाहावे लागते. छत्रपतींना युगप्रवर्तक म्हणण्यासाठी एका महत्त्वाच्या परिवर्तनाकडे पाहावे लागते. ते म्हणजे छत्रपतींचे सरदार व अन्य पदाधिकारी यांपैकी कुणालाही छत्रपतींनी वतने दिली नाहीत. वतनदारी पद्धत बंद करून वेतन सुरू केले. वतनदारांना वेतनदार बनवण्याचे परिवर्तन कल्पनातीत आहे. शिवछत्रपतींच्या समकालीनांच्याच नव्हे तर त्यांच्यानंतर येणाऱ्या काळातही हे परिवर्तन खूप वेगळे आणि विचारपूर्वक केलेले होते, हे दिसून येते. वतनदारांना त्यांच्या वतनामध्ये सारा गोळा करण्याचा पूर्ण हक्क मिळत असे. त्याचा अनेक वेळा दुरुपयोग होत असे. वतनदारांमुळे राजा थेट प्रजेपर्यंत पोहोचू शकत नव्हता. त्या मार्गात वतनदारीची पोलादी भिंत उभी असायची. वतनदारांचे अन्याय, अत्याचार राजापर्यंत पोहोचत नसायचे. त्यामुळे राजा हा जनतेचा प्रगल्भ प्रतिनिधी बनायला हवा असेल तर वतनदारांच्या मध्यस्थांचा वर्ग नाहीसा केला पाहिजे या बिनतोड विचारातून वतनदारी पद्धत बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला.

Advertisement

आपल्या सैनिकांचा पोशाख कसा असावा, यावर त्यांचे खूप स्पष्ट निर्देश होते. तो जलद हालचाली करण्यासाठी पूरक असावा. घोड्यावर लांबवर प्रवास करण्यासाठी योग्य असावा व एवढे सगळे असूनही तो प्रत्यक्ष लढाईच्या दृष्टीनेही योग्य असावा, या दृष्टीने तो बनवलेला होता. सैनिकांना लढाई नसतानाही सातत्याने प्रशिक्षण देण्यासाठी काही लष्करी तळ उभे केले होते. त्यात शस्त्रास्त्रांचे, तोफांचे व नंतरच्या काळात बंदुका चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची सोय होती. बदलत्या काळानुसार शस्त्र बदलणार आहे याची जाणीव ठेवून, शत्रूकडे अजून ज्यांचा विचार झाला नसेल अशी शस्त्रास्त्रे आपल्याकडे असावीत, यासाठी महाराज आग्रही असायचे.
गडबांधणीचे शास्त्रशुद्ध ज्ञान पोर्तुगीजांकडून शिकण्याची दूरदृष्टी महाराजांकडे होती. म्हणूनच समकालीन राजांच्या तुलनेत महाराजांची गडबांधणी अधिक शास्त्रशुद्ध व सामरिकदृष्ट्या अधिक व्यूहरचनात्मक होती. प्रत्येक गडावर पिण्याच्या पाण्याची बाराही महिने सोय, बाजारपेठा व इतर गरजेच्या गोष्टी या सगळ्या सुविधा होत्याच. पण हा गड प्रत्यक्ष लढाईच्या वेळी शत्रूशी लढण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिक काळ उपयोगी पडला पाहिजे, अशी त्यांची व्यूहरचना होती. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर स्वत: औरंगजेब आपल्या संपूर्ण फौजेनिशी उतरूनही आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतरही हा महाराष्ट्र २७ वर्षे प्रत्यक्ष औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत या गडकोटांच्या साहाय्याने स्वराज्याच्या शत्रूंशी दोन हात करत राहिला.

महाराजांची धार्मिक सहिष्णुता व जातिभेद न मानण्याची प्रगल्भताही विशेष उल्लेख करावी अशी आहे. महाराजांच्या विरोधात लढणारे मोगल, निझाम, आदिलशहा, कुतूबशहा हे धर्माने भले मुस्लिम असतील, पण म्हणून शिवछत्रपतींनी मुुस्लिमांचा कधीही द्वेष केला नाही. उलट लढाईत कुराणाची एखादी प्रत हाती आली तर मोठ्या भक्तिभावाने ते आपल्या मुस्लिम सैन्याच्या हाती देत. समोर मुस्लिम राजे असताना सरसेनापती नूर खान बेग होता. काझी हैदर हा वकील होता. आरमारप्रमुख दर्यासारंग हा मुस्लिम होता. बाबा याकुत हे त्यांना आदरस्थानी असणारे संत होते. एवढेच नाही तर आग्ऱ्याच्या वेढ्यात त्यांच्या मंचावर झोपून शिवछत्रपतींच्या सुटकेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणारा मदारी मेहतर हा मुस्लिम होता. याउलट शिवछत्रपतींच्या विरोधात शत्रूकडून लढणारे अनेक महाराष्ट्रीय अन् हिंदू सरदार होते. त्यामुळे शिवछत्रपतींनी प्रत्येक माणसाला त्याची योग्यता पाहून काम दिले व ती योग्यता त्या व्यक्तीकडे असेपर्यंतच ते पद त्या व्यक्तीकडे राहू दिले. शिवछत्रपतींच्या काळात योग्यता हाच एखादे पद मिळवण्याचा आणि मिळवलेले पद टिकवण्याचा एकमेव निकष होता. यात जातपात, धर्म, नातेगोते याचा कसलाही संबंध येत नसे.

शिवछत्रपतींचा आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांची विज्ञाननिष्ठा. शिवछत्रपतींनी कधीही धर्मातील त्याज्य रूढी-परंपरांना आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात स्थान दिले नाही. आपले वडील शहाजीराजेंचे निधन झाल्यावर त्यांनी जिजाऊ माँसाहेबांना सती जाऊ दिले नाही. महाराजांनी केलेल्या लढाया या रात्रीच्या वेळी झाल्या. त्यापैकी अनेक लढाया अमावास्येच्या रात्रीदेखील झाल्या. प्रचलित काळात अमावास्या अशुभ मानली जाई. त्या काळात महाराज लढले आणि जिंकलेही!

शिवछत्रपतींनी हाती तलवार घेतली, पण निष्पापांच्या रक्ताने ती कधी रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो. ते आई भवानीला कौल मागण्याइतके धार्मिक जसे होते, तसेच पोर्तुगीजांना किल्लेबांधणीचे अन् इंग्रजांना बंदुका अन् तोफा चालवण्याचे तंत्र विचारणारे व्यवहारी अन् आधुनिकही होते. प्रजेचा सांभाळ पित्याप्रमाणे करणारे कनवाळू पिता होते, तसेच बंडखोर-फितुरांना देहदंडाची शिक्षा देणारे कर्तव्यकठोर, न्यायनिष्ठुर राजाही होते. शिवछत्रपती हे माणूस होते की नियतीला पडलेले पूर्णत्वाचे स्वप्न होते, कळत नाही. आपण त्यांच्यातील एक तरी गुण अंगीकारावा हीच शिवजयंती साजरी करण्याची सगळ्यात चांगली पद्धत असेल!

Chief Editor Nazeer Wagu

Reported by Irfan Shaikh

[email protected]

8879726577


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!